प्रवास

journey through life

अनादीकालापासून मनाशी गर्भस्थ
असलेल्या अक्षराला…
कागदावर रुजवण्याचा मोह
अनावर होतो…
त्यावेळी समजून घ्यावं
कविता जन्माला येतेय…!

निपचित पडलेल्या ओळींमधले
उनाड संदर्भ…
अचानकपणे उठून सर्वांगाला
डंख मारू लागतात…
त्यावेळी समजून घ्यावं
कवितेला पंख फुटतायत …!

एकाचवेळी अनेकानेक शब्दांचे
तितकेच तीव्र प्रतिध्वनी…
बदलून टाकत असतील तिचा
अर्थ, रंग नि स्वभाव…
त्यावेळी समजून घ्यावं
कविता फुलून आलीय …!

कविता जाते पल्याड
पुस्तक, काळ नि काळजाच्याही…
उरते रसिकाच्या मनामनात,
अगदी कवीच्या सहीसकट …
त्यावेळी समजून घ्यावं
कविता आभाळापर्यंत पोचली …!!

40 thoughts on “प्रवास

  1. अश्फाक आपल्यातला कवी आता जन्माला आला आहे.त्याच्या वाढीसाठी आमच्या खुप खुप शुभेच्छा.

    Like

Leave a comment