सोहळा

wp-1461069393841.jpeg

प्राशून ऋतू नक्षत्रांचे,
तारुण्य वर्षितो आहे,
उत्फुल्ल मनाच्या डोही,
अवघा खेळ मांडतो आहे!

निळ्या सूरांच्या नक्षी,
कोरून रात्रीच्या देही,
मोहरल्या प्रीतीची सुमने,
या गगनात माळतो आहे!

स्पर्शाचे डंख हे गहिरे,
आसमंत झेलतो आहे,
विरघळल्या देहांभोवती,
सृष्टीचा श्वास कोंडतो आहे!

जपणार कशी तू सखये,
ही धुंद सुगंधी स्मरणे,
पौर्णिमेच्या काठावरुनी,
तो चंद्र सांडतो आहे!!!!

पैलतीर!!!

कळून येतो फोलपणा जगण्यातला
काळानुरूप मुखवटे फाटताना…
सुन्न करते नात्यांची विधीशून्यता नि
सोबत्यांची औपचारिकता…!

कचाकच तुडवली जाणारी
भावनांची स्पंदने…
उद्वेगाच्या तप्त खांद्यावर
आक्रंदतात असहायपणे…!

डोळ्यातली शून्य नजर
शोधत राहते…
अमावास्येच्या रात्रीत तेवणारा
मंद चिरंतन दिवा…!

मस्तकात तडतडलेली शीर
अभावितपणे शांत होत जाते…
निरर्थक प्रतिक्रिया नि
ओशाळवाण्या मुर्दाड चेहऱ्यांनी…!

उसवत जाणाऱ्या स्वप्नांची वीण
खिन्नपणे हसून वळते…
निराशेच्या पैलतीरावर
दुःख कोवळे नव्याने कळते…!!poster