सैराट:गुलाबी विषण्णतेचा दाह

wp-1462187069207.jpeg नागराज पोपटराव मंजुळेच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्याने जगण्यातल्या वेदनेचा,परिस्थितीच्या असहायतेचा वेध घेतल्याचच प्रामुख्याने पाहिलेल आहे.त्यातल्या भळभळत्या जखमेला पडद्यावर जिवंत करण्यात त्याचा हातखंडा आहे.फँड्री प्रदर्शित झाल्यापासून…त्याला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादापासून..नागराज मंजुळेच्या आगामी चित्रपटाविषयी उत्सुकता लागली होती.या वर्षीच्या सुरुवातीला टीज़र रिलीज झाल्यापासून ..गाणी..ट्रेलर..करत शेवटपर्यंत ती शिगेला पोचली…झी स्टुडिओचं भक्कम पाठबळ,अजय अतुलचं बहारदार संगीत नि दिग्दर्शकाचा खास रांगडा टच यामुळे वेगळेपण डोळ्यात भरत होतं…
सैराट तसा रूढ अर्थानी सैरभैर होण..बेभान होण..या इतक्याच मर्यादित चौकटीत न बसवता स्वप्नाळू प्रेम अन् वास्तवाचा दाह यांच्या तराजूत आयुष्य तोलताना दोन जीवांची होणारी घालमेल व्यक्त करतो.
विल्यम शेक्सपिअर जगातल्या तमाम रंगकर्मी,सिनेकलावंतांसाठी खजिना आहे.त्याच्या रोमिओ अँड जुलियट नाटकाची मोहिनी रसिकांवर अजूनही आहे.जागतिक स्तरावर त्यावर आधारित कित्येक नाटक,सिनेमे बनले आहेत.हिंदी चित्रपट सृष्टीत देखील कयामत से कयामत तक,इशकजादे,रामलीला या सिनेमांवर रोमिओ अँड जुलियट चा ठळक प्रभाव जाणवतो.नागराज मंजुळेचा सैराट सुद्धा विषयाच्या बाबतीत त्याच्याशी साधर्म्य दाखवतो.
सोलापूर जिल्ह्यातील बिटरगाव या छोट्याश्या गावात घडणार हे कथानक आहे.अर्चना पाटील(रिंकू राजगुरु)ही गावातल्या प्रतिष्ठित घरंदाज घराण्यातील मुलगी नि प्रशांत काळे(आकाश ठोसर)हा कोळी समाजातील गरीब घरचा साधासुधा पोर..त्यांची विहिरी वरची भेट,कॉलेज मधे नजरानजर,मित्रांच्या सहाय्याने चिठ्या-चपाटयानी प्रेमकथा फुलत जाते.एका विशिष्ट टप्प्यानंतर वास्तवाचे चटके बसतात अन सुरु होते जीवघेणी कुतरओढ..
पूर्वार्धात,आपल्या स्वभावाच्या चौकटीत न बसणारा ,नागराज आपल्याला दिसतो.कारण यापूर्वी आपण त्याला प्रेमातले गोडीगुलाबीचे रंग टिपताना कधी पाहिले नाहीत.फंड्री मधे केवळ एकतर्फी प्रेमाचा काही मिनिटे टिकणारा आविष्कार इथे मात्र अगदी तास दीड तास चालतो.हे कलात्मकते बरोबरच व्यावसायिकतेचे आव्हान नागराजने लीलया पेललेले आहे.प्रेमातली हुरहुर,स्वप्नाळू धुंदी,स्पर्शाची ओढ या भावभावना पडद्यावर चितारताना त्याने कसब पणाला लावल आहे.प्रेमासोबतच परश्याची मित्रांसोबतची धमाल,नाच,मस्ती एकदम पैसा वसूल आहे.ग्रामीण बोलीभाषेतला लहेजा अजून खुमारी वाढवतो नि रंगत येते.
उत्तरार्धात..चित्रपट वेगळ वळण घेतो..विद्रोहानंतर बदल लेल्या परिस्थितीचे चटके बसायला लागल्यानंतर प्रेमाची खरी परीक्षा सुरु होते नि प्रेक्षकवर्ग सावरून बसतो.आता पर्यंतचं सारं गोड गोड सुरु असताना..हशा,टाळ्या,शिट्या ओसरून एक शांतता सिनेमाघरात पसरते…इथे दिसतो..तो वास्तवाशी इमान राखणारा..त्याच्याशी असलेली नाळ अजिबात  तुटू न देणारा..आपल्या मूळ स्वभावाच्या डोहात शिरलेला दिग्दर्शक…सिनेमाचा खरा उत्कर्षबिंदू आहे..तो त्याचा शेवट.इथेही फंड्री प्रमाणे मास्टर स्ट्रोकच आहे..त्या वेळचा भिरभिरत येणारा दगड..कित्येक दिवस मनः पटलावरून विस्मरणात जात नव्हता…त्याच पद्धतीने ..काही पावले..या वेळी प्रेक्षकांना सुन्न करुन टाकतात..अगदी अनपेक्षितपणे..हा शेवट येतो नि येतो तो थेट अंगावरच..!!थिएटर मधून बाहेर पड़ताना मस्तक बधिर झालेल असतं..पुढचे काही तास त्याच तंद्रीत ओसरतात..!मेंदूची चिरफाड संपता संपत नाही..!!
कात टाकलेल्या मराठी सिनेसृष्टीसाठी हा एक उत्तम प्रयोग आहेच.पण एक कलाकृती म्हणून हा चित्रपट नक्कीच महत्वाचा आहे.पोकळ जातीचे क्षुद्र अभिमान मिरवणाऱ्या वर्चस्ववादी मानसिकतेचा निषेध नोंदवून तो थांबत नाही.सामाजिक विषमतेवर भाष्य करतानाच कुटुंबाची होणारी होरपळ दाखवतो.अडचणीच्या क्षणी आधार देणाऱ्या सत्शील प्रवृत्तीचे कवडसेही गवसतात.
चित्रपटातील काही त्रुटी राहिल्यासारख्या वाटतात.संकलन जर अधिक चांगल्या पद्धतीने झाल असतं..तर विषय जास्त तीव्रतेने भिडला असता..तसच काहीसा छाया कदम यांच्या पात्राचा अचानक झालेला प्रवेश..हे कुठे न कुठे खटकतं…मित्राच्या प्रेमकथेलाही कात्री लागली असती..तरी चालण्या सारख होतं..असो..
अभिनयाच्या बाबतीत रिंकूने कमाल केलीये.इयत्ता नववीत शिकणाऱ्या या मुलीने तिचं पात्र इतक्या सफाईदार पद्धतीने साकरलय …की..क्या बात है!! तथाकथित सौंदर्याच्या व्याख्येत न बसणार तिच रूप..त्यातही मोट्ठे,टपोरे डोळे प्रेमात पाडतात..तिचा डॅैशिंग सहज वावर,उच्चवर्गीय असल्याचा थाट,नंतर होणारी फरपट तिने ताकदीने दाखवली आहे.तिच्या तुलनेत थोडी कमी सशक्त व्यक्तिरेखा वाट्याला आलेल्या आकाश ठोसरनेही ही उत्तम अदाकारी सादर केली आहे..काहीसा लाजाळु,मित्रांना जीव लावणारा,संयत पण प्रेमाची जबाबदारी घेणारा तरुण त्याने चांगला रंगवला आहे..त्याला त्याच्या मित्रांचीही चांगली साथ लाभली आहे. आणखी छाया कदम वगळता..इतरांच्या भूमिकांना जास्त वाव नाही.
संगीत हा सैराट चा आणखी एक हुकमी एक्का…अक्षरशः वेड लावणारी गाणी अजय अतुलनी या निमित्तानी दिली आहेत.अजयने लिहिलेली ही गाणी..अगदी हॉलीवुडच्या नामवंत वाद्यवृंदासोबत रेकॉर्ड केलेली आहेत…अवीट गाण्यांचा हा अल्बम आयुष्यभर संग्रही ठेवावा असा आहे.तांत्रिक गोष्टीतही चित्रपट उजवा आहे..सुधाकर रेड्डीचं कॅमेरा वर्क अप्रतिम झालेल आहे…त्यातही सूर्यास्ताच्या वेळी ड्रोनच्या सहाय्याने घेतलेल प्रेमी युगुलाचं चित्रण तर केवळ लाजवाब!!
नागराज हा आता बंडखोर तरीही प्रयोगशील दिग्दर्शकांच्या मांदियाळीत बसणार अग्रणी नाव झाल आहे..या चित्रपटात त्याच्या दिग्दर्शकीय अस्तित्वाची व्याप्ती त्याने आणखी वाढवली आहे..अगदी नवख्या कलाकारांकडून मनासारखा अभिनय करुन घेण्यात तो तरबेज आहे…त्याच्या सलग तीन कलाकृतीतल्या अभिनयाचा गंधही नसलेल्या तीन कलाकारांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होतो..यातच सारं काही आल..जाती पातीच्या,उच्च-निम्न स्तरातील संघर्षाची कहाणी सांगताना तो समाजाला जणू काही आरसाच दाखवतो..रोजच्या जगण्यात अशी कित्येक युगुले बळी पडतात..कित्येक जणाना खोट्या प्रतिष्ठेपायी..कुटुंबासाठी..प्रेमाचा अंकुर मनातल्या मनात खुडून टाकावा लागतो..एकविसाव्या शतकात जगतानाही निरर्थक रूढी परंपराना दूर न सारणाऱ्या..प्रसंगी रक्ताच्या नात्यालाही रक्तात लोळवणाऱ्या भिकार समाजाच्या षंढ मानसिकतेची मनस्वी चीड येते.चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकाला कुठे तरी ही सल लागून राहते.अप्रतिम शेवटानंतर तो विचार करायला प्रवृत्त होतो..यातूनच नागराजचं कौशल्य सिद्ध होतं.चित्रपटाकड़े केवळ करमणुकीच्या दृष्टीने पाहणाऱ्यानाही हा अस्वस्थ करतो…सजग,प्रगल्भ प्रेक्षकांसाठी तर ही न चुकवावी अशी मेजवानी!!
बा नागराजा..अपेक्षा आणखी वाढवल्या आहेस!!आता पुन्हा उत्सुकता!!पुन्हा सैराट,पुन्हा झिंगाट!!पुन्हा भिरकावत येणारा दगड..पुन्हा असहाय काही पावल!!पुन्हा सुन्न मस्तक..पुन्हा मेंदूला झिणझिण्या!!
भेट लवकरच!!!!

Advertisements

4 thoughts on “सैराट:गुलाबी विषण्णतेचा दाह

  1. Wow enjoy really reading …good piece…Sairat baghanyapekshya tu thodakyat aani sutrabdha lihalela saransh parat parat wachava watato. Proud of you bro. Please keep writing and updating. Thanks!

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s