गीतांजली:होशवालों को खबर क्या..

image

   तारुण्यातल्या लोभस,उत्कट प्रेमाचे आविष्कार शब्दबद्ध करताना कित्येक कवी,शायरांची प्रतिभा पणास लागते.आपापल्या दृष्टिकोनातून,चिंतनातून प्रेमाची व्याख्या सांगताना,व्याप्ती स्पष्ट करताना अर्थातच ते कल्पनाविलासाचा आधार घेतात. नकळत वैयक्तिक अनुभवाचे कडू गोड कवडसे काव्यातून डोकावतात.यातून प्रेमाविषयीच्या इतक्या तर्हेच्या,विरुद्ध टोकावरच्या रचनांची निर्मिती झाली आहे.भाषेगणिक त्यांतली विविधता आणखी विस्तारत गेली आहे.केवळ उर्दू शायरांचा विचार करता..’इश्क़ में ख़्वाब का खयाल किसे,न लगी आँख जब से आँख लगी’ म्हणणारे मीर मोहम्मद हयात भेटतात…तर ‘ये इश्क़ नहीं आसाँ,बस इतना समझ लीजिए,इक आग का दरिया है और डूब के जाना है’ असं सांगणारे जिगर मुरादाबादी ही तितकेच जवळचे वाटतात.
     उर्दू शायरांनी हिंदी चित्रपटसृष्टीला आपल्या काव्यप्रतिभेने पुरेपूर समृद्ध केलं आहे.शकील बदायुनी,कैफ़ी आज़मी,साहिर लुधियानवीपासूनचा हा प्रवास आजच्या इर्शाद कामिल पर्यंत अव्याहतपणे सुरु आहे.(काळानुरूप, त्याला उतरती कळा लागली असल्याची दुर्दैवी खंत आहेच).या नामावलीमध्ये निदा फाजलींचं नाव विशेषत्वाने घ्यावं लागेल.
निदा फाजलींचे आई वडील फाळणीच्या वेळी पाकिस्तानात गेले तरी त्यांनी भारतातच राहण्याचा निर्णय घेतला होता.तरुणपणी एका मंदिराशेजारी सूरदासचे दोहे गायले जात असताना ते निदांच्या कानी पडले.त्या दोह्यंतलं शाब्दिक सौंदर्य थक्क करूँ गेलं..राधे कृष्णाच्या प्रेमबंधातली काव्यात्मकता इतक्या खोलवर परिणाम करुन गेली…की त्यांनी काव्यालाच जीवनाचं इतिकर्तव्य मानायला सुरुवात केली नि त्यांच्या हातून एकाहून एक सरस निर्मिती झाली.मीरा,कबीर यांसोबतच उर्दू शायर मीर, गालिब यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. हिंदी सिनेमातल्या ‘आ भी जा’,’तू इस तरह मेरे जिंदगी में शामिल’,’घर से मस्जिद है’ अशा कित्येक मधुर गाण्यांसोबत आणखी एक गाणं त्यांची ओळख बनलं…ते म्हणजे तारुण्यसुलभ भावनांनी ओथंबलेलं ‘होशवालों को खबर क्या..’ हे गाणं!!
      जॉन मैथ्यू मथानने निर्मित दिग्दर्शित केलेल्या ‘सरफरोश’ चित्रपटातलं हे एक अवीट गोडीचं गाणं. जतीन-ललित या सदाबहार जोडीने उत्तम संगीत दिलेल्या गाण्याला निदा फाजलींच्या शब्दांची  अन जगजीत सिंहांच्या सुरांची साथ लाभली आहे.चित्रपटात कमालीचा देखणा करारी आमिर,सुंदर निरागस सोनालीसोबतच दुहेरी मुखवटा धारण केलेला नसीर, यांच्या अभिनयाने चार चाँद लागले आहेत.
      नुकताच आय.पी.एस.अधिकारीपदावर रुजू झालेला अजय राठोड त्याच्या आवडत्या गज़ल गायक गुलफ़ाम हसन यांच्या एका कॉन्सर्टनिमित्त गेला असता, तिथे त्याची सीमाशी नजरानजर होते. त्यातून दिल्लीच्या कॉलेजच्या आठवणींना फ्लॅशबॅक तंत्राने मिळालेला उजाळा दाखवण्यासाठी हे गीत पडद्यावर येते.ही दृश्य योजना अतिशय अप्रतिमरित्या साकारली गेली आहे.जगजीत सिंहांचे दैवी सुर या गज़लेच्या माध्यमातून अनुभवायला मिळतात.निदा फाजलींचे सहजसुंदर अर्थपूर्ण शब्द गाण्याला वेगळ्याच उंचीवर नेतात.
     प्रेम केल्यानंतरच जीवनानंदाचा खरा आस्वाद उपभोगता येतो.शुद्धीवर असणाऱ्यांना प्रेमात हरवलेपणाच्या जाणिवेची किंमत काय ठाऊक,असा खडा सवाल करतानाच नजरानजर झाल्यानंतर उजळून निघालेल्या आसमंताला, प्रेमातल्या जादुई चमत्काराच्या प्रचितीचं प्रतिक ठरवलं आहे.या गाण्यातलं तिसरं कडवं केवळ अफलातून आहे.हा असा काव्यकल्पनाविलास म्हणजे काव्याच्या तारांगणातली नक्षत्रंच जणू. ‘खुलती जुल्फों ने सिखायी मौसमों को शायरी,झुकती आँखों ने बताया मेहकशी क्या चीज़ है’…वाह.!!.सुभानअल्लाह!! म्हटल्याखेरीज जीवाला चैनच पडत नाही. नुकतीच न्हालेली तरुणी केसाच्या बटांना मोकळी करत असताना..त्यांनी निसर्गाला शायरी शिकवणं हे फक्त निदा फाजलीच लिहू शकतात.शालीनतेने झुकणारी नजर तुम्हाला आकंठ बुडणं शिकवून जाते.(प्रेमात बरं का…दुसरा अर्थ नको!!!)
     कथेचा नायक काहीसा हळवा आहे,लाजरा बुजरा आहे.पटकन व्यक्त होणं त्याला नाही जमत.त्याच्या भावना नायिके पर्यंत तो पोचवू शकत नाही. ती गोष्ट ओठापर्यंत तो आणू शकला नाही नि काय दुर्दैव…तिलाही समजलं नाहीये की, मौनातच दडलेली असते..प्रेमाची अस्सल रूमानी भाषा!! एक एक कडवं काव्याने काठोकाठ भरलेलं, चिर तारुण्याचं गोंदण लाभलेलं असं झालं आहे.
      या गाण्याचं चित्रीकरणही फार सुरेख झालं आहे. नुकत्याच तारुण्यात पदार्पण केलेल्या दोघांची रस्त्यावर झालेली भेट..त्यात तिचा स्कार्फ हवेने उडत नकळत त्याच्या चेहऱ्यावर येणं, तिने तो परत मागायला आल्यानंतर होणारी नेत्रपल्लवी..नंतर त्याचं अभ्यासात लक्ष न लागणं..तिच्या घराभोवती चकरा टाकणं..कॉलेजमध्ये गॅदरिंग,लायब्ररी,अभ्यासानिमित्त एकमेकांकडे टाकलेले कटाक्ष..त्यातलं अत्यंत मोहक अनामिक हरवलेपण तरलतेने पडद्यावर उतरलेलं आहे..एकदा ती स्कार्फ लायब्ररीमधे विसरून जाते..तेव्हा तो मिळाल्याचा स्वर्गीय आनंद,तो दिवसभर  हातात घेऊन  लुनावर हवेत उडवण्यातून व्यक्त करतो..त्याच्या सुगंधात आकंठ बुडून जातो..नंतर असाच प्रयत्न केला असता..त्याची चोरी पकडली जाते..एव्हाना नायिकेला आपणही प्रेमात पडल्याची अनुभूती आलेली असते..परेडच्या दरम्यान तो भान विसरून तिच्याकडे पाहत असतो, त्याची नक्कल तिच्या मैत्रिणींसोबत करताना तिला हसू आवरत नाही..त्याचा भित्रेपणा,मनस्वी प्रेम,हुरहुर यांची परीक्षा घेण्यात जाम भारी वाटतं तिला..
       अशा कुठल्याही कॉलेजच्या तरुण-तरुणींना आपलंसं वाटणारं हे गाणं मन जिंकून जातं. काही खास कारणांमुळे माझं या गाण्याशी वेगळ नातं आहे..त्याशिवायही निदा फाजलींचं भाषासौंदर्य अन जगजीत सिंहांच्या तलम रेशमी आवाजामुळे ही गज़ल पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटते.
    

हल्लीचे दिवस

image

हल्लीचे दिवस
फार रिकामे रिकामे वाटतात…
कपाटातील पुस्तके
काढल्यानंतर दिसणाऱ्या जागेसारखे..
मोजमाप करुन आखलेल्या
वेळेच्या रूपरेषा
वटारतात डोळे स्वच्छंदी मनावर..
तसेही उत्स्फूर्ततेच्या जाणिवा
बोथटच होत चालल्या
आहेत
उगवणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक…
रंगांधळेपणाच्या अनुभूतीचं
अस्तित्व अंगभर नकळतपणे
वागवलं जातंय..
वाढत चालला आहे त्याचा
अंधारातल्या सावलीला संसर्ग
मावळणाऱ्या प्रत्येक सूर्यागणिक…
अक्षरशः खायला उठते रात्र
शब्दही परके वाटू लागतात
लेखणीतली शाई काही
लिहिण्याआधीच संपून गेलेली असते,
अमूर्ततेच्या कल्पनांनाही
अव्यक्ततेची जोड लाभते,
सरणाऱ्या प्रत्येक प्रहरागणिक…
उजाड रानात
कोरडया नक्षत्रांच्या साथीने
वाट पाहणाऱ्या निष्पर्ण
झाडाच्या देहाशी
माझं रिकामपण साधर्म्य साधतं..
न्यूनत्वाच्या समांतर रेषा जोडल्या जातात…
उरणाऱ्या प्रत्येक शून्यागणिक..,
निसर्ग पुन्हा एकदा सिद्ध होतो!!!

स्कूल का पहला दिन

image

    पिछले महीने पाँचवा सालगिरह था चीकू का.बहोत खुश था चीकू उस दिन.बडा सा केक,मोमबत्तियाँ,रंगबिरंगे गुब्बारे,ढेर सारे खिलौने..इन सब के बावजूद..अब्बूजान ने उसे विडियो गेम गिफ्ट में दिया था..जिसकी वो काफी दिनों से ज़िद कर रहा था.उसी दिन अम्मी से अब्बूजान ने कहा था की अब चीकू को स्कूल में दाखिला देने का वक़्त आ गया है.
      ….तो..आज चीकू के स्कूल जाने का पहला दिन है.कल अब्बूजान ने उसके लिए नया यूनिफॉर्म,बॅग,कुछ किताबें,जूते ले आए थे. तीन कापीयाँ,ड्रॉइंग बुक और स्केच पेन भी थे.उन्हें घर में सब को दिखाते दिखाते वो दोपहर का खाना भूल गया था.बॅग तो उसे बेहद पसंद आयी थी.उसके फेवरेट कार्टून्स..डोनाल्ड डक और मिकी माउस की तस्वीर,जो बॅग पर छपी थी,वो सारे दोस्तों को दिखाने वाला था.मोहल्ले में रहने वाले रोहन,गुड्डी,हमीद,दीपू सब आज से ही स्कूल जाने वाले थे.कल गार्डन में चोर पुलिस खेलकर वो जल्दीही घर वापस आया था.
    सुबह नहा धोकर नया यूनिफार्म पहनके, टेबल पर पड़ी इत्र की बोतल से कुछ फव्वारे कपड़ों पे छिड़क कर साहब कुछ इस तरह उछल रहे थे..जैसे आज ईद  का दिन हो..इस भाग दौड़ में किचन से गुज़रते वक़्त..कुछ बर्तन जमीं पर रखे हुए थे..उन्हें ठोकर लग गयी.अम्मी ने डाँट लगाकर एक जगह बिठाया.कंघी करवायी,पाउडर लगाया, नए सॉक्स पहनाए.अलहम्दुलिल्लाह और कुलुल्लाह के सुरहे पढ़वाए.चीकू की बॅग तैयार की गयी.
    आज नाश्ते में खीर बनी थी.खाते खाते कुछ छींटे नयी ड्रेस पर गिर गए,तो फिर से अम्मी की डाँट पड़ी.अब्बूजान किसी काम से बाहर गए थे.पर दादी माँ पास में ही थीं,सो,उन्होंने संभाल लिया..’कोई बात नहीं..मेरा राजा बेटा!!’कहके उसके गालों को हलके से सहलाया.’आज स्कूल का पहला दिन है न बेटा..तो ठीक से रहना हाँ..कोई मस्ती-हंगामा मत करना..वहाँ पे टीचर होंगे..अगर तुमने कुछ किया तो वहाँ डाँट नहीं पड़ेगी..सीधे मार पड़ेगी मार..!’ इस मार लफ्ज़ ने माजरा बिगाड़ दिया.पिछली साल मस्जिद के मौलाना ने क़ायदा पढ़ते वक़्त चीकू को गलती करने पर गाल पे चांटा मारा था..तब से उसने उसने वहां जाना छोड दिया था.
    दादी माँ की बात सुनकर उसका मुंह खुला के खुला रह गया.प्लेट में खीर वैसी ही रह गयी.उसका पडोसी दोस्त भोला जो दूसरी कक्षा में पढता है..उसने भी कहा था..’बच्चू..स्कूल में ना..टीचर छड़ी चलाती हैं छड़ी..मैंने तो दो बार सू-सू ही कर ली थी क्लास में’..वो सब याद आकर चीकू ने आँखों में आँसू भर लिए और जोर से चिल्लाया..’मैंने नहीं जाना कोई स्कूल वूल..कभी नहीं..जाना मुझे..’वो बात उसकी बड़ी बहेन ज़ीनत ने सुन ली.तुरंत बोली’ए रोतलू..स्कूल के पहले दिन कोई रोता है क्या.. लड़कियों की तरह..’कहकर वो खिलखिलाके हंसने लगी.अब होना क्या था..चीकू जोर से रोने लगा.
   तभी अब्बू जान की गाडी ने घर के सामने आकर जोर का हॉर्न बजाया.ज़ीनत ‘अब्बू आ गए..अब्बू आ गए’ की रट लगाते हुए गेट की तरफ भागी. चीकू भी हमेशा ऐसा ही करता था.पर आज छोटे मियाँ का मिज़ाज कुछ अलग था..सो नहीं गए.
    अब्बू ने आकर देखा..चीकू स्कूल के लिए तैयार तो है..पर रो रहा है.वे मुस्कुरा दिए और पास आकर आँसू पोंछते हुए बोले..’क्यों जनाब,स्कूल ऐसे ही जाओगे क्या?’ कुछ देर उसने कुछ नहीं कहा..फिर नाक साफ़ करते बोला..’अब्बू..मैं स्कूल नहीं जाऊंगा..वहाँ टीचरें होती हैं..बात बात पर बच्चों को छड़ी से मारती हैं.
    ‘अच्छा! तुम्हें किसने बताया?’
    ‘वो भोला है न भोला..और दादी माँ ने भी’
    ‘ठीक है चीकू..मत जाना स्कूल.. ‘ अब्बूजान ने ठंडी आवाज़ में कहा और वो आँखें बडी कर के उनकी ओर देखने लगा.’हाँ बेटा..मत जाना स्कूल..पर जब तुम्हारे सारे दोस्त चले जाएं..तो अकेले खेलना पड़ेगा तुम्हें..और बड़े होकर पुलिस अफसर बनना है ना तुम्हें..ढिशुम ढिशुम वाले..वो भी नहीं बन पाओगे..तुम्हारी नयी बॅग भी वैसी ही पडी रहेगी..और कल दादी माँ ने तुमसे कहा था ना की रोज स्कूल से आने के बाद एक टॉफी तुम्हे देंगी..अब वो भी नहीं मिलेगी..ठीक है..मत जाओ स्कूल’
    रसोई घर से हँसने की आवाज़ें आईं..अम्मी ने भी उंची आवाज में कहा ‘हाँ चीकू बेटा..बिल्कुल मत जाना..तुम्हारे लिए आज शाम पकौड़े और जामुन बनने वाले थे..सो..मेरा काम तो बच गया..!!अब दाल चाँवल ही खा लेना पेट भर के!’
    दादी माँ और ज़ीनत भी हंसने लगे.सारा घर हंसने लगा..सिवाय चीकू के..!! बेचारा टीचरों की छड़ी..पुलिस अफसर..इनसे ज़्यादा पकौड़े जामुन और दाल चांवल में उलझा हुआ था.अब्बू जान सही कह रहे थे..दोस्तों के साथ भी जाना था..बैग भी दिखानी थी..टॉफी भी चाहिये थी..उसने फैसला कर लिया और यकायक बोला ‘नहीं..नहीं..मुझे स्कूल जाना है..स्कूल जाना है!!’
    तभी दादी माँ पास आईं और दाहिने गाल पर काजल का टीका लगाते हुए कहा..’मेरा राजा बेटा…चीकू..तुम गुड बॉय हो ना..फिर किसलिये डरना..छड़ी का मार तो बॅड बॉय को मिलता है..शरारत नहीं करोगे तो तुम्हें आज दो टॉफियां मिलेंगी और टीचर भी खुश.याद रखना..”पढोगे लिखोगे तो बनोगे नवाब,खेलोगे कूदोगे तो बनोगे ख़राब”..और शाम को तो तुम्हें खेलना है ही ना..तो स्कूल में बिना किसी शरारत के दिल लगा के पढ़ना हाँ..मेरा गुड बॉय है ..चीकू!!’
   ‘अच्छा दादी माँ!’चीकू ने मुस्कुराते हुए कहा और अब्बूजान की ओर देखके जोर से बोला’अब्बू..जल्दी चलिए..देर हो जायेगी स्कूल के लिए..!!’
   घर एक बार फिर से हंसी से भर गया!!!
  

गोंदण

image

कित्ती दिवस झाले
आतातरी ऐकवतोयस का कविता??
माझ्या सततच्या नकारानंतर
तुझा पंधरावा प्रश्न..
न राहवून माझी डायरी
हातात घेतो..
नेहमीच्या संकेतस्थळावर
संध्याकाळचा बेत ठरतो..
बागेतली फुलंही तुझ्या इतकीच
कान देऊन ऐकू लागतात..
कुठल्याशा निसर्ग कवितेचे
स्वगत बोलू लागतात..
प्रेमकवितेतल्या नवथर चिंब
दवबिंदूंच्या वर्णनांवेळी
तुझे लकाकणारे डोळे..
कुठल्याही अलंकारापेक्षा
कमी भासत नाहीत..
आणि नसतो माझ्या कवितेतला
चंद्र कधीही  मुग्ध इतका..
जितका तो ऐकताना तुझ्या
गालांवरच्या खळ्यांत उतरतो..
सामाजिक जाणिवांच्या
कवितांची तुझी नावड
माहीत असूनही,
ती मुद्दाम ऐकवल्यावर
तुझ्या चौथ्या जांभयीची दाद
मला तृप्त करुन जाते..
डायरीतून क्वचितच
डोकावणारी हास्यकविता..
तुला कारण देऊन जाते
पुढच्या आठवडाभर हसण्यासाठी..
तिच्या ओळींतल्या संदर्भावरुन
मला छळण्यात तू विसरून
जातेस भान भवतालचे..
शेवटी विरहकवितांची वेळ येते
जड झालेल्या आवाजासकट..
तुझ्या पाणावलेल्या नजरेकडे
पाहण्याचा धीर होत नाही..
एखाद्या हळव्या ओळीच्या
ओलेत्या शीर्षबिंदुजवळ
तू नकळत हात हातात घेतेस..
नि पुढच्या क्षणी कविता
तुझ्या डोळ्यांतून वाहून जाते..

यमक,मुक्तछंद,आरोह,अवरोह
या सर्वांपलीकडे जाऊन..
तुझ्या माझ्या मनांबरोबरच
रात्रीच्या काळ्या कागदावर,
कवितांची निळी अक्षरे
गोंदली गेलेली असतात..
आभाळीचा खट्याळ चंद्र
गालातल्या गालात खुदकन हसतो
नि परतीच्या वाटेवरच्या
दोन हातांचा गुंता
सुटता सुटत नाही..!!

प्रासंगिक:उडता पंजाब(की पहलाज?) आणि सेन्सॉर बोर्ड

image

  चित्रपट हे मनोरंजनासोबतच मानवी मूल्यांना नवीन परिमाण देत जाणिवांच्या, प्रगल्भतेच्या कक्षा रुंदावण्यासाठी उपयोगी पडणारं महत्वाचं साधन आहे.प्रेक्षकवर्ग त्याला कसा स्वीकारतो हा सर्वस्वी त्याचा प्रश्न आहे.तसा चित्रपट त्याच्या उण्यापुऱ्या गुणदोषांसकट प्रेक्षकांपर्यंत पोचावा की न पोचावा,यावर देखरेख ठेवण्यासाठी (सिनेमेटोग्राफ एक्ट ची अंमल बजावणी)सेंट्रल बोर्ड ऑफ़ सेंसर्स ची 1952 मधे स्थापना झाली.कालांतराने त्यात काही नवे बदल घडवून 1983 मध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ़ सर्टिफिकेशन असं नामकरण करण्यात आलं.आधी फक्त ‘यु’आणि ‘ए’अशी दोनच प्रमाण पत्रे दिली जायची..नंतर ती ‘यु’,’यु/ए’,’ए’ आणि ‘एस’अशी विविध वयोगटानुसार,प्रेक्षकवर्गानुसार देण्यात येतात.मात्र हे देण्यासोबतच काही सीन्स,शब्द,वाक्यांना सेन्सॉर बोर्ड बिनबोभाटपणे कात्री लावते.प्रदर्शनाला बंदी घालते.आजता गायत बोर्डाची भूमिका वादग्रस्त राहिली आहे.त्याची तीव्रता चित्रपटागणिक वाढते आहे हे सध्याच्या ‘उडता पंजाब’च्या निमित्ताने सर्वांसमोर आले आहे. सेन्सॉरच्या कात्रीत सापडलेल्या चित्रपटांमध्ये 1959सालच्या’नील आकशेर नीचे’ पासून अगदी या वर्षीच्या ‘मोहल्ला अस्सी’चा समावेश होतो.म्हणजे या अशा कित्येक चित्रपटांवर बंदी आणली गेली..याशिवाय कट्स सुचवल्या गेलेल्या चित्रपटांची तर गणती होणे शक्यच नाही.कुठल्याही चित्रपट निर्माता,दिग्दर्शकासाठी ही बाब प्रचंड मनस्तापाची असते.कारण इतकं जीव तोडून काम केल्यावर त्या कलाकृतीची पडद्यावर मांडणी तुटक तुटक दिसत असेल..तर कोणाला समाधान मिळणार आहे? सध्या अनुरागने घेतलेल्या आक्रमक भूमिकेचं कौतुक यासाठी की इतर निर्माते, दिग्दर्शकांनी निमूटपणे मान्य केलेले कट्स,बंदी यांना झुगारून तो कोर्टाची पायरी चढतोय..आधीही अशी वेळ आली होती..पण यंदा सर्व स्तरांवरून त्याला मिळणारा प्रतिसाद खुप आशावादी अन बोलका आहे.
    भरीस भर म्हणून पहलाज निहलानी नावाचा प्रचंड कर्तृत्ववान(?)माणूस या बोर्डाचा अध्यक्ष आहे.अध्यक्ष झाल्यापासून काहीही फुटकळ,निर्बुद्ध कारणे दाखवून कट्स वा बंदी सुचवण्यात या माणसाला कोणता आनंद मिळत असावा..देव जाणो!! जेम्स बॉन्डच्या ‘स्पेक्टर’ वा ‘तमाशा’मधील चुंबन दृश्यांची लांबी कमी करण्यापासून ते उड़ता पंजाब मध्ये 89 कट्स सुचवणाऱ्या निहलानीने कौटुंबिक पार्श्वभूमीच्या ‘प्रेम रतन धन पायो’लाही तीन सीन्स वगळण्यास भाग पाडले होते…आता बोला!! त्याच वेळी ‘क्या कूल हैं हम3’ आणि ‘मस्तीज़ादे ‘सारख्या सेक्स कॉमेडीजना प्रदर्शनाची मुक्त परवानगी दिली होती.अतिशय सुमार 10 ते 15 चित्रपटांचे निर्माते असल्याची एकमेव पात्रता असणारा हा माणूस इतक्या महत्वाच्या पदावर नियुक्त करणाऱ्या माहिती आणि प्रसार मंत्रालयाला त्रिवार वंदन!!!
      त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट म्हणजे सरकारने त्यांच्यावर सातत्याने होणारी टीका पाहून ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगलांची समिती नेमली आहे..सेन्सॉर बोर्डाच्या कार्यपद्धतीवर बदल सुचवण्यासाठी..त्या समितीने सविस्तर अभ्यास करुन काही मुद्दे मांडले आहेत. प्रामुख्याने बोर्डाचं काम केवळ सर्टिफिकेट देण्या इतपत ठेवलं आहे..त्यात काही काटछाट करण्याचे अधिकार कमी केले आहेत.मात्र काही अपवाद वगळता..म्हणजे सिनेमेटोग्राफ एक्ट च्या सेक्शन 5 बी(1) ला धक्का पोहोचता कामा नये…यात अभिव्यक्तिस्वातंत्र्याशी निगडित गोष्टी येतात..देशाच्या एकूण सुरक्षेला,सार्वभौमिकतेला,एकात्मतेला,औचित्याला, नैतिकतेला,परराष्ट्र सम्बन्धाना बाधा न आणता तुम्हाला व्यक्त होता येतं..प्रॉब्लेम असा आहे की..औचित्य आणि नैतिकता यांची नेमकी व्याख़्या संविधानात दिलेली नाही..प्रत्येक जण सोईनुसार अर्थ लावत जातो..त्यामुळे बेनेगल समिती तितकी यशस्वी ठरली नाही..असे दुर्दैवाने म्हणावे लागते..तरीही सदस्यांच्या नेमणुका,अध्यक्षांचे छाटलेले पंख या दृष्टीने ही समिती महत्वाची आहे.पूर्ण अहवाल 20 जून पर्यंत येणार असल्याने आणखी सकारात्मक सुचना यात असतील अशी आशा करुयात.नाहीतर पुन्हा पाढे पंचावन्न!!
    
अनुराग कश्यप या प्रयोगशील, वेगळ्या वाटेेवरचे वास्तवदर्शी चित्रपट करणाऱ्या दिग्दर्शकाला त्याच्या कारकीर्दीच्या बारशा पासूनच सेन्सॉरचा त्रास झालेला आहे.त्याचा पहिला सिनेमा ‘पांच’हा आजतगायत प्रदर्शित होऊ शकला नाही.नंतरच्या ‘ब्लैक फ्राइडे’,’देव डी’,’गुलाल’च्या प्रदर्शनबाबतीत कुठे ना कुठे कोर्ट वा सेन्सॉर बोर्डाचा अडथळा आलेला आहे..यंदा तो निर्मात्याच्या भूमिकेत आहे..त्याच्यासोबत अशा कित्येक राष्ट्रीय,प्रादेशिक निर्माता,दिग्दर्शकांना हा त्रास भोगावा लागला आहे..लागतो आहे..मुळात कुठलाही दिग्दर्शक केवळ शिवीगाळ,सेक्स,हिंसाचार दाखवण्यासाठी चित्रपट करत नाही..त्या त्या विषयाशी संबंधित घटनांना अनुसरुन प्रसंगाच्या गरजेप्रमाणे या गोष्टी पूरक म्हणून येतात..हे समजण्या इतकी प्रगल्भता आधी सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्ष,सदस्यांना येणं आवश्यक आहे.त्यानंतर आपण प्रेक्षकांचा विचार करू शकतो.
उड़ता पंजाब मध्ये सध्या पंजाबमधल्या ड्रग्स च्या विळख्यात सापडलेल्या तरुणाईचं वास्तव मांडलेलं आहे.पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकांची सावली सेन्सॉर बोर्डाने घेतलेल्या भूमिकेमागे आहे..अशी शंका घेण्यास पुरता वाव आहे.पहलाज निहलानी महाशयांची सध्याची विधाने त्याकडेच बोट दाखवतात.मागच्या नोव्हेंबरमध्ये त्यांनी ‘मेरा भारत महान’नावाचा मोदींचं व सरकारचं गुणगाण करणारा एक हास्यास्पद वीडियो बनवला होता आणि प्रत्येक चित्रपट सुरु होण्या आधी तो दाखवणं बंधनकारक केलं होतं. ट्वीटर,फेसबुक वरुन त्याची यथेच्छ खिल्ली उडवली गेल्यानंतर मोदींनी तो वीडियो दाखवल्याबद्दल निहलानींची कडक शब्दात हजेरी घेऊन तो काढायला सांगितला होता.इतके होऊनही साहेबांचं अध्यक्ष पद टिकून आहे. हे राजकीय वरदहस्ता शिवाय शक्य नाही.’हम करे सो कायदा’या न्यायाने अध्यक्ष पदाचा कारभार चालवणाऱ्या निहलानींना हटवण्याची वेळ आली आहे.निव्वळ संस्कृती रक्षणाचे ठेकेदार असल्याचा आव आणण्यात किंवा समाजाच्या नैतिकतेला जपण्याची जबाबदारी डोक्यावर घेऊन ढोल बडवत,इतरांच्या हक्कांची गळचेपी करण्यात काहीही अर्थ नाही.हे जर असंच चालू राहिलं तर केवळ चांदोबाच्या गोष्टी वाचून अन बड़बड़गीते ऐकूनच रसिकांना समाधान मानावं लागेल.
भविष्यात तरी..अनुराग कश्यपच्या लढ़याला यश मिळावं…या महत्वाच्या संस्थेत जाणकार,अनुभवी माणसाची अध्यक्षपदी नेमणूक व्हावी..किंवा श्याम बेनेगल समितीच्या (अपेक्षित फेरबदलांसकटच्या) शिफारसींची काटेकोर अंमलबजावणी व्हावी..या गोष्टींची अपेक्षा करण्याशिवाय आपल्या हातात उरते तरी काय??

गीतांजली:मेरा कुछ सामान

image

नेमका काळ आठवत नाही..साक्षात्काराचा तो क्षणही आठवत नाही..पण गुलज़ार नावाच्या अवलियाने माझ्या सौंदर्यदृष्टीला स्पर्श केल्यानंतर मी त्यांचे चित्रपट, त्यांची गाणी, त्यांची पुस्तके,त्यांच्या सीरियल्स ..अधाशीपणाने पाहिले..ऐकले..वाचले..अनुभवले!! केवळ चित्रपटांचा विचार केल्यास..स्वतःच्या आगळया वेगळ्या नर्मविनोदी शैलीतून भावनिक गुंत्याचे पदर ज्या विलक्षण हातोटीने गुलज़ार पडद्यावर उलगडून दाखवतात..त्यास तोड नाही..ते अनुभवणं हा एक सोहळा असतो…मुळात शायरीचा पिंड असलेल्या, फाळणीच्या जखमा आयुष्यभर सोसलेल्या या हरहुन्नरी किमयागाराबद्दल नंतर सविस्तर लिहीनच..तूर्तास त्यांच्या ‘इजाज़त’ मधल्या     ‘मेरा कुछ सामान’बद्दल..
    ‘इजाज़त’ हा गुलज़ारांचा एक मास्टरपीस! मूळ बंगाली कथेवर आधारित या चित्रपटात रेखा,नसीर,अनुराधा पटेल यांनी अभिनयाचे असे काही रंग भरलेत की आत्मा तृप्त व्हावा..!! सुधा(रेखा) केवळ परिस्थितीखातर महेंद्र(नसीर)शी लग्न झाल्यामुळे त्याच्या पूर्वायुष्याबद्दल अनभिज्ञ असते..महेंद्र हा माया(अनुराधा पटेल)सोबत भावनिकरित्या गुंतलेला असतो..मायालाही महेंद्र बद्दल कमालीचं प्रेम..काही कारणाने माया गायब होते..सुधा महेंद्रचं लग्न झाल्यावर तो तिला घडल्या प्रकाराची कबुलीही देतो.अचानक माया परतते नि कथानकाला वेगळ वळण भेटतं..एका गहिऱ्या शोकान्तिकेकडे जाणारा हा प्रवास वाटेेवरल्या चकव्यांसकट मनाला चटका लावून जातो..
    सुधाजवळ मायाबद्दल बोलताना..तिची कविता वाचून दाखवताना नसीरने त्याच्या देहबोलीचा,संवाद फेकीचा उत्तम वापर केला आहे..अचानक सोडून जाण्याआधी माया ..ही बंडखोर..मनस्वी जगण्याची आवड असणारी आधुनिक स्त्रीची मूर्तिमंत प्रतिमा म्हणून अवतरते..काव्यप्रतिभेची दैवी देणगी लाभल्याने..तिने त्याच्याविषयीच्या भावना कवितेद्वारे व्यक्त केलेल्या असतात..त्या ती मागे ठेऊन जाते..ते काव्य म्हणजेच हे गाणं..!!तिच्या नजरेतूनच ते पडद्या वर आकार घेतं..
     गुलजारांचे शब्द..आर.डी.बर्मनचं संगीत..आशाजींचे सूर…यांचा त्रिवेणी संगम होऊन हे गाणं जन्माला आलं..यामध्ये नेमकं कोण श्रेष्ठ असा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही..तिघेही आपापल्या क्षेत्रातले दिग्गज मंडळी.!!प्रियकराजवळ राहिलेलं सामान..आठवणींचं नाजुक ओझं..वेदनांची जड गाठोडी..परत मागताना मायाच्या हळव्या मनाच्या जाणिवा अधिकच उत्कट बनतात..नि संपूर्ण गाण्यातून प्रवाहित होतात..गुलज़ारांच्या या गाण्यातील शब्दांपुढे नतमस्तक होण्याखेरीज पर्याय उरत नाही..कसली प्रचंड कल्पना क्षमता..चिमटीत पकडलेले शब्द..कालातीत उरणारा अर्थ!!जिनियस यार!!
   ‘ख़त में लिपटी रात’असो..’पत्तों के गिरने की आहट पहनके लौटाना’असो वा ‘गीला मन भिजवाना’असो..!!या शब्दप्रभूच्या अफाट प्रतिभेला मनापासून सलाम करावासा वाटतो..गाणं एक वेगळ्या उंचीवर येतं जेव्हा ती ओळ येते..’एक सौ सोलह चाँद की रातें,एक तुम्हारे कांधे का तील’ हे निव्वळ कातिल आहे..अशी तुलना मी आजवर कधी न ऐकली न अनुभवली..इतकी आर्त भावना क्वचितच कुठल्या गाण्यात सापडत असेल…झूठ मूठ के शिकवे अन झूठमूठ के वादे परत आठवायला सांगणारी माया म्हणजे तमाम प्रेमभंग झालेल्या तरुण तरुणींच्या हृदयाचा कोलाज असल्यासारखी भासते..सरते शेवटी..हे इतकं सारं पाठवून झाल्यावर..तिला ते मिळाल्यानंतर सर्वकाही दफन करायचं आहे..त्यानंतर तिला परवानगी हवीय..तिथेच कायमस्वरूपी झोपण्यासाठी..!! तिचं ते तसं इजाज़त मागणं..काळीज हेलावून टाकतं..!!अशा उत्कट,करुण शेवटाने गाण्याची इतिश्री होते!!
   आर.डी.बर्मन नि गुलज़ार ही गोडजोळी  ‘दो हंसों का जोडा’म्हणून त्याकाळी विख्यात होती..या गाण्याचं हस्तलिखित जेव्हा गुलजारानी आर.डी.ना दाखवलं..त्यावेळी तो माणूस जवळ जवळ ओरडलाच..’हे काय आणलंयस तू? याला काय गाणं म्हणतात?उद्या वर्तमानपत्राची रद्दी घेऊन येशील नि सांगशील मला चाल लावायला..कशी लावणार?’ असं सुनावलं सुद्धा गुलज़ारांना..कसं बसं समजावून सांगून फिल्मच्या यूनिटने त्यांना तयार केलं..तरीही यमक आणि पारंपरिक गाण्यांचा बाज न पाळल्यानं साशंक होते आर.डी.! तिथेच  बसलेल्या आशाताईंनी तो कागद हातात घेतला नि गुणगुणायला सुरुवात केली..त्यात हलकीशी चाल होती..तीव्र चढ उतार नसलेली..सहज सुंदर..बस्स..आर.डी.ना जे हवं ते मिळालं..नंतरचा इतिहास सर्वश्रुत आहे.
    या गाण्यात ‘पतझड है कुछ’ नंतर एक गॅप होता..तो गॅप आशाताईंनी भरून काढला..अशी आख्यायिका सांगितली जाते..ते जे अप्रतिम ‘है ना’ आहे ना..ते त्यांनीच ऐनवेळी चढवलेलं लेणं आहे म्हणे..त्या  ‘है ना’ ने रसिकांच्या मनाचा अक्षरशः ठाव घेतला..!!या गाण्याने तिन्ही दिग्गजांना भरभरुन दिलं..आशाजींना कारकिर्दीतला दुसरा नॅशनल अवॉर्ड मिळाला..गुलज़ारना नॅशनल अन फ़िल्म फेयर दोन्ही मिळाले..त्यांच्याही पेक्षा जे सुख रसिकांना मिळालं..ते अमाप होतं..आजही गाणं तितकंच चिरतरुण वाटतं..माझ्यासकट कित्येक सिने संगीत प्रेमींसाठी हे गाणं म्हणजे..आयुष्याच्या शेवट पर्यंत जपून ठेवाव्याशा वाटणाऱ्या ‘सामानासारखं’ आहे..चिरंतन झोप लागण्याआधी कानात साठवून घ्याव्याशा मंत्रासारखं..त्यासाठी इजाज़त कुणाची मागणार?? त्या तिघांनी ती आधीच दिली आहे..अगदी मुक्तहस्ते!!