गीतांजली:मेरा कुछ सामान

image

नेमका काळ आठवत नाही..साक्षात्काराचा तो क्षणही आठवत नाही..पण गुलज़ार नावाच्या अवलियाने माझ्या सौंदर्यदृष्टीला स्पर्श केल्यानंतर मी त्यांचे चित्रपट, त्यांची गाणी, त्यांची पुस्तके,त्यांच्या सीरियल्स ..अधाशीपणाने पाहिले..ऐकले..वाचले..अनुभवले!! केवळ चित्रपटांचा विचार केल्यास..स्वतःच्या आगळया वेगळ्या नर्मविनोदी शैलीतून भावनिक गुंत्याचे पदर ज्या विलक्षण हातोटीने गुलज़ार पडद्यावर उलगडून दाखवतात..त्यास तोड नाही..ते अनुभवणं हा एक सोहळा असतो…मुळात शायरीचा पिंड असलेल्या, फाळणीच्या जखमा आयुष्यभर सोसलेल्या या हरहुन्नरी किमयागाराबद्दल नंतर सविस्तर लिहीनच..तूर्तास त्यांच्या ‘इजाज़त’ मधल्या     ‘मेरा कुछ सामान’बद्दल..
    ‘इजाज़त’ हा गुलज़ारांचा एक मास्टरपीस! मूळ बंगाली कथेवर आधारित या चित्रपटात रेखा,नसीर,अनुराधा पटेल यांनी अभिनयाचे असे काही रंग भरलेत की आत्मा तृप्त व्हावा..!! सुधा(रेखा) केवळ परिस्थितीखातर महेंद्र(नसीर)शी लग्न झाल्यामुळे त्याच्या पूर्वायुष्याबद्दल अनभिज्ञ असते..महेंद्र हा माया(अनुराधा पटेल)सोबत भावनिकरित्या गुंतलेला असतो..मायालाही महेंद्र बद्दल कमालीचं प्रेम..काही कारणाने माया गायब होते..सुधा महेंद्रचं लग्न झाल्यावर तो तिला घडल्या प्रकाराची कबुलीही देतो.अचानक माया परतते नि कथानकाला वेगळ वळण भेटतं..एका गहिऱ्या शोकान्तिकेकडे जाणारा हा प्रवास वाटेेवरल्या चकव्यांसकट मनाला चटका लावून जातो..
    सुधाजवळ मायाबद्दल बोलताना..तिची कविता वाचून दाखवताना नसीरने त्याच्या देहबोलीचा,संवाद फेकीचा उत्तम वापर केला आहे..अचानक सोडून जाण्याआधी माया ..ही बंडखोर..मनस्वी जगण्याची आवड असणारी आधुनिक स्त्रीची मूर्तिमंत प्रतिमा म्हणून अवतरते..काव्यप्रतिभेची दैवी देणगी लाभल्याने..तिने त्याच्याविषयीच्या भावना कवितेद्वारे व्यक्त केलेल्या असतात..त्या ती मागे ठेऊन जाते..ते काव्य म्हणजेच हे गाणं..!!तिच्या नजरेतूनच ते पडद्या वर आकार घेतं..
     गुलजारांचे शब्द..आर.डी.बर्मनचं संगीत..आशाजींचे सूर…यांचा त्रिवेणी संगम होऊन हे गाणं जन्माला आलं..यामध्ये नेमकं कोण श्रेष्ठ असा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही..तिघेही आपापल्या क्षेत्रातले दिग्गज मंडळी.!!प्रियकराजवळ राहिलेलं सामान..आठवणींचं नाजुक ओझं..वेदनांची जड गाठोडी..परत मागताना मायाच्या हळव्या मनाच्या जाणिवा अधिकच उत्कट बनतात..नि संपूर्ण गाण्यातून प्रवाहित होतात..गुलज़ारांच्या या गाण्यातील शब्दांपुढे नतमस्तक होण्याखेरीज पर्याय उरत नाही..कसली प्रचंड कल्पना क्षमता..चिमटीत पकडलेले शब्द..कालातीत उरणारा अर्थ!!जिनियस यार!!
   ‘ख़त में लिपटी रात’असो..’पत्तों के गिरने की आहट पहनके लौटाना’असो वा ‘गीला मन भिजवाना’असो..!!या शब्दप्रभूच्या अफाट प्रतिभेला मनापासून सलाम करावासा वाटतो..गाणं एक वेगळ्या उंचीवर येतं जेव्हा ती ओळ येते..’एक सौ सोलह चाँद की रातें,एक तुम्हारे कांधे का तील’ हे निव्वळ कातिल आहे..अशी तुलना मी आजवर कधी न ऐकली न अनुभवली..इतकी आर्त भावना क्वचितच कुठल्या गाण्यात सापडत असेल…झूठ मूठ के शिकवे अन झूठमूठ के वादे परत आठवायला सांगणारी माया म्हणजे तमाम प्रेमभंग झालेल्या तरुण तरुणींच्या हृदयाचा कोलाज असल्यासारखी भासते..सरते शेवटी..हे इतकं सारं पाठवून झाल्यावर..तिला ते मिळाल्यानंतर सर्वकाही दफन करायचं आहे..त्यानंतर तिला परवानगी हवीय..तिथेच कायमस्वरूपी झोपण्यासाठी..!! तिचं ते तसं इजाज़त मागणं..काळीज हेलावून टाकतं..!!अशा उत्कट,करुण शेवटाने गाण्याची इतिश्री होते!!
   आर.डी.बर्मन नि गुलज़ार ही गोडजोळी  ‘दो हंसों का जोडा’म्हणून त्याकाळी विख्यात होती..या गाण्याचं हस्तलिखित जेव्हा गुलजारानी आर.डी.ना दाखवलं..त्यावेळी तो माणूस जवळ जवळ ओरडलाच..’हे काय आणलंयस तू? याला काय गाणं म्हणतात?उद्या वर्तमानपत्राची रद्दी घेऊन येशील नि सांगशील मला चाल लावायला..कशी लावणार?’ असं सुनावलं सुद्धा गुलज़ारांना..कसं बसं समजावून सांगून फिल्मच्या यूनिटने त्यांना तयार केलं..तरीही यमक आणि पारंपरिक गाण्यांचा बाज न पाळल्यानं साशंक होते आर.डी.! तिथेच  बसलेल्या आशाताईंनी तो कागद हातात घेतला नि गुणगुणायला सुरुवात केली..त्यात हलकीशी चाल होती..तीव्र चढ उतार नसलेली..सहज सुंदर..बस्स..आर.डी.ना जे हवं ते मिळालं..नंतरचा इतिहास सर्वश्रुत आहे.
    या गाण्यात ‘पतझड है कुछ’ नंतर एक गॅप होता..तो गॅप आशाताईंनी भरून काढला..अशी आख्यायिका सांगितली जाते..ते जे अप्रतिम ‘है ना’ आहे ना..ते त्यांनीच ऐनवेळी चढवलेलं लेणं आहे म्हणे..त्या  ‘है ना’ ने रसिकांच्या मनाचा अक्षरशः ठाव घेतला..!!या गाण्याने तिन्ही दिग्गजांना भरभरुन दिलं..आशाजींना कारकिर्दीतला दुसरा नॅशनल अवॉर्ड मिळाला..गुलज़ारना नॅशनल अन फ़िल्म फेयर दोन्ही मिळाले..त्यांच्याही पेक्षा जे सुख रसिकांना मिळालं..ते अमाप होतं..आजही गाणं तितकंच चिरतरुण वाटतं..माझ्यासकट कित्येक सिने संगीत प्रेमींसाठी हे गाणं म्हणजे..आयुष्याच्या शेवट पर्यंत जपून ठेवाव्याशा वाटणाऱ्या ‘सामानासारखं’ आहे..चिरंतन झोप लागण्याआधी कानात साठवून घ्याव्याशा मंत्रासारखं..त्यासाठी इजाज़त कुणाची मागणार?? त्या तिघांनी ती आधीच दिली आहे..अगदी मुक्तहस्ते!!
   
   

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s