प्रासंगिक:उडता पंजाब(की पहलाज?) आणि सेन्सॉर बोर्ड

image

  चित्रपट हे मनोरंजनासोबतच मानवी मूल्यांना नवीन परिमाण देत जाणिवांच्या, प्रगल्भतेच्या कक्षा रुंदावण्यासाठी उपयोगी पडणारं महत्वाचं साधन आहे.प्रेक्षकवर्ग त्याला कसा स्वीकारतो हा सर्वस्वी त्याचा प्रश्न आहे.तसा चित्रपट त्याच्या उण्यापुऱ्या गुणदोषांसकट प्रेक्षकांपर्यंत पोचावा की न पोचावा,यावर देखरेख ठेवण्यासाठी (सिनेमेटोग्राफ एक्ट ची अंमल बजावणी)सेंट्रल बोर्ड ऑफ़ सेंसर्स ची 1952 मधे स्थापना झाली.कालांतराने त्यात काही नवे बदल घडवून 1983 मध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ़ सर्टिफिकेशन असं नामकरण करण्यात आलं.आधी फक्त ‘यु’आणि ‘ए’अशी दोनच प्रमाण पत्रे दिली जायची..नंतर ती ‘यु’,’यु/ए’,’ए’ आणि ‘एस’अशी विविध वयोगटानुसार,प्रेक्षकवर्गानुसार देण्यात येतात.मात्र हे देण्यासोबतच काही सीन्स,शब्द,वाक्यांना सेन्सॉर बोर्ड बिनबोभाटपणे कात्री लावते.प्रदर्शनाला बंदी घालते.आजता गायत बोर्डाची भूमिका वादग्रस्त राहिली आहे.त्याची तीव्रता चित्रपटागणिक वाढते आहे हे सध्याच्या ‘उडता पंजाब’च्या निमित्ताने सर्वांसमोर आले आहे. सेन्सॉरच्या कात्रीत सापडलेल्या चित्रपटांमध्ये 1959सालच्या’नील आकशेर नीचे’ पासून अगदी या वर्षीच्या ‘मोहल्ला अस्सी’चा समावेश होतो.म्हणजे या अशा कित्येक चित्रपटांवर बंदी आणली गेली..याशिवाय कट्स सुचवल्या गेलेल्या चित्रपटांची तर गणती होणे शक्यच नाही.कुठल्याही चित्रपट निर्माता,दिग्दर्शकासाठी ही बाब प्रचंड मनस्तापाची असते.कारण इतकं जीव तोडून काम केल्यावर त्या कलाकृतीची पडद्यावर मांडणी तुटक तुटक दिसत असेल..तर कोणाला समाधान मिळणार आहे? सध्या अनुरागने घेतलेल्या आक्रमक भूमिकेचं कौतुक यासाठी की इतर निर्माते, दिग्दर्शकांनी निमूटपणे मान्य केलेले कट्स,बंदी यांना झुगारून तो कोर्टाची पायरी चढतोय..आधीही अशी वेळ आली होती..पण यंदा सर्व स्तरांवरून त्याला मिळणारा प्रतिसाद खुप आशावादी अन बोलका आहे.
    भरीस भर म्हणून पहलाज निहलानी नावाचा प्रचंड कर्तृत्ववान(?)माणूस या बोर्डाचा अध्यक्ष आहे.अध्यक्ष झाल्यापासून काहीही फुटकळ,निर्बुद्ध कारणे दाखवून कट्स वा बंदी सुचवण्यात या माणसाला कोणता आनंद मिळत असावा..देव जाणो!! जेम्स बॉन्डच्या ‘स्पेक्टर’ वा ‘तमाशा’मधील चुंबन दृश्यांची लांबी कमी करण्यापासून ते उड़ता पंजाब मध्ये 89 कट्स सुचवणाऱ्या निहलानीने कौटुंबिक पार्श्वभूमीच्या ‘प्रेम रतन धन पायो’लाही तीन सीन्स वगळण्यास भाग पाडले होते…आता बोला!! त्याच वेळी ‘क्या कूल हैं हम3’ आणि ‘मस्तीज़ादे ‘सारख्या सेक्स कॉमेडीजना प्रदर्शनाची मुक्त परवानगी दिली होती.अतिशय सुमार 10 ते 15 चित्रपटांचे निर्माते असल्याची एकमेव पात्रता असणारा हा माणूस इतक्या महत्वाच्या पदावर नियुक्त करणाऱ्या माहिती आणि प्रसार मंत्रालयाला त्रिवार वंदन!!!
      त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट म्हणजे सरकारने त्यांच्यावर सातत्याने होणारी टीका पाहून ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगलांची समिती नेमली आहे..सेन्सॉर बोर्डाच्या कार्यपद्धतीवर बदल सुचवण्यासाठी..त्या समितीने सविस्तर अभ्यास करुन काही मुद्दे मांडले आहेत. प्रामुख्याने बोर्डाचं काम केवळ सर्टिफिकेट देण्या इतपत ठेवलं आहे..त्यात काही काटछाट करण्याचे अधिकार कमी केले आहेत.मात्र काही अपवाद वगळता..म्हणजे सिनेमेटोग्राफ एक्ट च्या सेक्शन 5 बी(1) ला धक्का पोहोचता कामा नये…यात अभिव्यक्तिस्वातंत्र्याशी निगडित गोष्टी येतात..देशाच्या एकूण सुरक्षेला,सार्वभौमिकतेला,एकात्मतेला,औचित्याला, नैतिकतेला,परराष्ट्र सम्बन्धाना बाधा न आणता तुम्हाला व्यक्त होता येतं..प्रॉब्लेम असा आहे की..औचित्य आणि नैतिकता यांची नेमकी व्याख़्या संविधानात दिलेली नाही..प्रत्येक जण सोईनुसार अर्थ लावत जातो..त्यामुळे बेनेगल समिती तितकी यशस्वी ठरली नाही..असे दुर्दैवाने म्हणावे लागते..तरीही सदस्यांच्या नेमणुका,अध्यक्षांचे छाटलेले पंख या दृष्टीने ही समिती महत्वाची आहे.पूर्ण अहवाल 20 जून पर्यंत येणार असल्याने आणखी सकारात्मक सुचना यात असतील अशी आशा करुयात.नाहीतर पुन्हा पाढे पंचावन्न!!
    
अनुराग कश्यप या प्रयोगशील, वेगळ्या वाटेेवरचे वास्तवदर्शी चित्रपट करणाऱ्या दिग्दर्शकाला त्याच्या कारकीर्दीच्या बारशा पासूनच सेन्सॉरचा त्रास झालेला आहे.त्याचा पहिला सिनेमा ‘पांच’हा आजतगायत प्रदर्शित होऊ शकला नाही.नंतरच्या ‘ब्लैक फ्राइडे’,’देव डी’,’गुलाल’च्या प्रदर्शनबाबतीत कुठे ना कुठे कोर्ट वा सेन्सॉर बोर्डाचा अडथळा आलेला आहे..यंदा तो निर्मात्याच्या भूमिकेत आहे..त्याच्यासोबत अशा कित्येक राष्ट्रीय,प्रादेशिक निर्माता,दिग्दर्शकांना हा त्रास भोगावा लागला आहे..लागतो आहे..मुळात कुठलाही दिग्दर्शक केवळ शिवीगाळ,सेक्स,हिंसाचार दाखवण्यासाठी चित्रपट करत नाही..त्या त्या विषयाशी संबंधित घटनांना अनुसरुन प्रसंगाच्या गरजेप्रमाणे या गोष्टी पूरक म्हणून येतात..हे समजण्या इतकी प्रगल्भता आधी सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्ष,सदस्यांना येणं आवश्यक आहे.त्यानंतर आपण प्रेक्षकांचा विचार करू शकतो.
उड़ता पंजाब मध्ये सध्या पंजाबमधल्या ड्रग्स च्या विळख्यात सापडलेल्या तरुणाईचं वास्तव मांडलेलं आहे.पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकांची सावली सेन्सॉर बोर्डाने घेतलेल्या भूमिकेमागे आहे..अशी शंका घेण्यास पुरता वाव आहे.पहलाज निहलानी महाशयांची सध्याची विधाने त्याकडेच बोट दाखवतात.मागच्या नोव्हेंबरमध्ये त्यांनी ‘मेरा भारत महान’नावाचा मोदींचं व सरकारचं गुणगाण करणारा एक हास्यास्पद वीडियो बनवला होता आणि प्रत्येक चित्रपट सुरु होण्या आधी तो दाखवणं बंधनकारक केलं होतं. ट्वीटर,फेसबुक वरुन त्याची यथेच्छ खिल्ली उडवली गेल्यानंतर मोदींनी तो वीडियो दाखवल्याबद्दल निहलानींची कडक शब्दात हजेरी घेऊन तो काढायला सांगितला होता.इतके होऊनही साहेबांचं अध्यक्ष पद टिकून आहे. हे राजकीय वरदहस्ता शिवाय शक्य नाही.’हम करे सो कायदा’या न्यायाने अध्यक्ष पदाचा कारभार चालवणाऱ्या निहलानींना हटवण्याची वेळ आली आहे.निव्वळ संस्कृती रक्षणाचे ठेकेदार असल्याचा आव आणण्यात किंवा समाजाच्या नैतिकतेला जपण्याची जबाबदारी डोक्यावर घेऊन ढोल बडवत,इतरांच्या हक्कांची गळचेपी करण्यात काहीही अर्थ नाही.हे जर असंच चालू राहिलं तर केवळ चांदोबाच्या गोष्टी वाचून अन बड़बड़गीते ऐकूनच रसिकांना समाधान मानावं लागेल.
भविष्यात तरी..अनुराग कश्यपच्या लढ़याला यश मिळावं…या महत्वाच्या संस्थेत जाणकार,अनुभवी माणसाची अध्यक्षपदी नेमणूक व्हावी..किंवा श्याम बेनेगल समितीच्या (अपेक्षित फेरबदलांसकटच्या) शिफारसींची काटेकोर अंमलबजावणी व्हावी..या गोष्टींची अपेक्षा करण्याशिवाय आपल्या हातात उरते तरी काय??

Advertisements

2 thoughts on “प्रासंगिक:उडता पंजाब(की पहलाज?) आणि सेन्सॉर बोर्ड

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s