अश्वत्थामा

सुमारे पाच हजार वर्षांपासून,

कुठल्याशा निर्जन,निर्बिड अरण्यात

भटकत असलेल्या अश्वत्थाम्याला

हाताशी धरून,समोर बसवून,

विचारावे वाटतात काही प्रश्न..

तुझ्या जन्माची आख्यायिका..

दारिद्रयाचे चटके..पिठाचं दूध..

कपाळावरचा दिव्यमणी..

सारं काही खरं होतं का रे..

का नाही बोचत इतिहासाला

तुझ्यावर झालेला अन्याय..

आयुष्यभर धर्माज्ञेचं काटेकोर पालन

केलंय का कुणी तुझ्या इतकं..

निव्वळ एका रात्री झालेली दुर्बुद्धी 

नि ओढवलेला सर्वनाश..

आणि नव्हता करता आला उपसंहार

तुझ्याद्वारे सोडलेल्या ब्रह्मस्त्राचा..

त्यात तुझी चूक किती??

जन्मदात्या पित्याने शिकवलेली

अर्धवट विद्या नि पूर्ण शिक्षा तुला..

आणि नेमकं हेच का टिपलं गेलंय

या अजस्त्र कालखंडाच्या नोंदवहीत..?

का विसर पडतो जगाला

वेदशास्त्र संपन्न,विद्वत्तेचं मूर्तिमंत

उदाहरण असलेल्या पापभीरु अश्वत्थाम्याचा..

साऱ्या कलांमधे पारंगत असूनही

पित्याचं प्रेम कुणा शिष्यावरच जास्त आहे..

या जाणिवेचं शल्य कसं मोजणार कुणी..?

साक्षात धर्माचं नाव लावणाऱ्या ज्येष्ठ पांडवानं

अन जगन्नियंता असल्याचा आव आणणाऱ्या

मुरलीधराने कपटाने द्रोणांचा वध करविला..

त्या वेळची दुःखविदिग्धता

काळाचे काळीज चिरणारी नव्हती का..??

पित्याने सोडलेला प्राण ही

केवळ तुझ्यावरच्या प्रेमाची अनुभूती

असल्याचं कळल्यावर

कसल्या विचारांचं काहूर माजलं

असेल तुझ्या मनात..?

भाळावरचा दिव्यमणी छाटून टाकणाऱ्या

पार्थाच्या तलवारीने,त्या वेळी

उडालेल्या रक्ताच्या चिळकांडीसकट

इतिहासाची किती पाने रक्तरंजित केली आहेत..?

 त्या जखमेतून प्रवाहित झालेल्या

रक्त नि पूवाच्या नद्यांची संख्या तरी किती..?

युगंधराने तुला अमरत्वाचा शाप देऊन

तुझ्यातल्या दिव्यत्वाची केलेली क्रूर थट्टा

कुठल्या उ:शापाने दूर होणार आहे..?

जगभरातल्या शोकान्तिकांचा शेवट

तुझ्या भळभळत्या जखमेच्या

उल्लेखानेच होतो..तर..तर..

वैश्विक दुः खाच्या प्रतिकात्मकतेचं,

मूक आक्रोशाच्या विफलतेचं,

दुर्दैवी कारुण्याच्या संचिताचं,

रोगजर्जर देहाच्या व्याधींचं,

चिरंतन झालेल्या वेदनेचं…

नेमकं ओझं असतं तरी किती??

हे पुराणपुरुषोत्तमा…देशील उत्तर???

14 thoughts on “अश्वत्थामा

  1. sir..mla awdli h kavita…medico la itk suchn asambhv aste…pn prattekacha ek pina asto ass mla watate.je nhi mhatl tri kuthun n kuthun kontya n kontya margan bhetatch..jyach tyala…

    Like

  2. डॉक्टरसाहेब सर्वप्रथम तुमचे अभिनंदन करतो.असेच शब्दांतून व्यक्त होत रहा.दिवसेंदिवस आपल्या काव्यातील प्रगल्भता वाढत आहे.अश्वत्थामा कविता वाचताना याचा प्रत्यय येतो.काही वर्षापुर्वी मी मृत्यूंजय कादंबरी वाचली होती आणि आज मला ती परत नव्याने वाचल्यासारखी वाटत आहे.धन्यवाद.

    Liked by 1 person

  3. खुप खुप आभार..अरुण!!असेच प्रोत्साहन देत राहा…मनापासून धन्यवाद!!

    Like

Leave a reply to Sunith Cancel reply