ऍनिमल फार्म ते इंडियन ऍनिमल फार्म!

सन 1945.. म्हणजे जवळपास पंच्याहत्तर वर्षापूर्वी..नाव ..खरं नाव एरिक आर्थर ब्लेयर.. टोपण नाव जॉर्ज ऑर्वेल…या अवलियाने निव्वळ 112 पानांची एक कादंबरी लिहिली ..नाव होतं ‘ॲनिमल फार्म’..त्याची स्वतःची समाजवादी लोकशाही विषयीची असणारी पराकोटीची आस्था तसेच

फॅसिजम आणि स्टॅलिनीजमला असणारा आत्यंतिक विरोध या कादंबरीच्या जन्मास कारणीभूत ठरला .उपरोधिक भाषा शैलीचा प्रभावी वापर करून प्रस्थापित एकाधिकारशाहीला बोचकारत कथानकातील क्रांतिकारकांच्या चुकांवर बोट ठेवण्यात तो कमालीचा यशस्वी झाला. सुरुवातीला प्रकाशित होण्याआधी हजारो नकार पचवल्यानंतर जेव्हा ‘कोल्ड वार ‘सुरु झाल्यानंतर अमेरिकेत पहिली आवृत्ती निघाली,त्यावेळी यशाचे कित्येक कीर्तिमान स्थापित झाले. ‘टाईम’ सारख्या मासिकाने शतकातल्या सर्वोत्तम 100 कादंबऱ्यांमध्ये समाविष्ट करून यथोचित सन्मान मिळवून दिला. त्यातली ‘All animals are equal,but some animals are more equal than others’असो वा’Man serves the interest of no creature except himself’ किंवा मग ‘If liberty means anything at all means the right to tell people what they do not want to hear’ या सारखी अवतरणे अजरामर झालेली आहेत.

यानंतर येते एक मराठी कादंबरी.. 2019 साली.. लेखक आहेत प्रवीण दशरथ बांदेकर ..नाव ‘इंडियन ॲनिमल फार्म’ ..मूळ ऑर्वेलच्या कादंबरीचा आत्मा तोच ठेवून सभोवतालच्या वातावरणाचं ‘भारतीयीकरण’ करत बांदेकर आपल्या पुढ्यात एका विलक्षण रूपक कथेचं दृश्य चित्र रेखाटतात. ऑर्वेलने वापरलेले ओल्ड मेजर, स्नोबॉल ,नेपोलियन सारखी डुकरे ,बॉक्सर मोली असे घोडे ,बेंजामिन सारखे गाढव यासारखे प्राणी हे राजकीय सामाजिक संदर्भातील पात्रं रूपक म्हणून बांदेकरांच्या कादंबरी देखील येतात, ती वेगळ्या नावाने. कादंबरीच्या सुरुवातीस आदर्शवादी कृष्णा घोड्याची हत्या होऊन शिवारात नव्या मालकाच्या नावाखाली राजकारणाचे डाव खेळत काही प्राणी इतरांवर कुरघोडी करत कसे शोषण करतात व त्या विरोधात इतर प्राण्यांनी उभारलेला लढा याचे चित्रण आहे. वाचत असताना आजच्या वर्तमानातील राजकीय -सामाजिक -धार्मिक वृत्ती प्रवृत्तींचा पटकन संदर्भ लागत असतो वा तो लावण्याचा आपण कळत नकळत प्रयत्न करत असतो. सर्वसाधारण 2014 नंतर बदललेले भारतीय राजकारण, जनमानसाची टोकदार मते, विचारवंतांच्या हत्या,मॉब लिंचींग, अभिव्यक्तिस्वातंत्र्यावरचे आक्रमण या पार्श्वभूमीवर कादंबरी पटकन रिलेट होते .साहेबराव डुक्कर, नानोपंत श्वान, म्हादू बैल,मोहिनी मांजर, बाजीराव गाढव हे प्राणी आणि त्यांचे स्वभाव विशेष यांच्यामागे लपलेल्या मिथकांना ओळखायला फारसे कष्ट पडत नाहीत. या मिथकांचा वापर अतिशय खुबीने करत बांदेकरांनी जागोजागी उपहास पेरून ठेवला आहे. ‘शिवार धमाका’ किंवा ‘एकच वाहिनी’ सारख्या माध्यमांनी चालवलेली सनसनाटी एकांगी राजकीय भूमिका पाहता आजच सकाळी टीव्हीवर पाहिले का असा प्रश्न चमकून जातो.

यासोबतच शोषणाविरुद्ध,अराजकतेविरुद्ध ठाम विरोधी भूमिका घेताना विशिष्ट आदर्शवादी तत्वज्ञानाशी बांधिलकी असणं..सिद्धांतांविषयी आत्यंतिक टोकाची भूमिका घेतानाच, वर्तमानात त्याच्या उपयुक्ततेच्या शक्याशक्यतांचा सारासार बुद्धीने आकलन करण्याचा अभाव,त्याचे सामाजिक लढ्यावरचे परिणाम याचेही ही प्रत्ययकारी चित्रण बांदेकरांनी केले आहे. अन्यायाशी दोन हात करतानाही नकळत उधळलेल्या जाती-धर्माच्या अस्मितांचे वारू कसे अनियंत्रित होत जातात आणि वाढत्या असुरक्षित वातावरणात नवनवे झेंडे कसे उदयास येतात, हे दाखवताना उद्याच्या प्राप्त राजकीय परिस्थितीतील बदलत जाणार्‍या दिशांतून ओघळणारे नवीन प्रश्न आपसूकच नजर शोधत राहते. शोषित समाजाचे अवघडलेपण, हतबलता, वर्गापरत्वे येणारा अंतर्विरोध या साऱ्यांचा सत्ताकेंद्रे आपल्या स्वार्थासाठी कसा पद्धतशीर वापर करतात याचं प्रतिकात्मक दर्शन बऱ्याच प्रसंगात घडतं. आऊटडेटेड झालेल्या तत्वज्ञानाला सजग तरुणांच्या आधुनिक विचारांची जोड देताना, सातत्याने चिकित्सक वृत्ती जोपासण्याचा मूलमंत्र देऊन कादंबरीचा समारोप होतो.

ऑर्वेलच्या कादंबरीच्या शेवटी दाटून आलेले नैराश्याचे मळभ न दाखवता बांदेकर त्यांच्या शैलीत उद्याच्या अभ्युदयाची किरणं दाखवत आशादायी चित्तप्रवृत्ती जिवंत ठेवतात. सबंध कादंबरीभर इतकी पात्र असून, इतक्या वेगवेगळ्या गतीने घडणाऱ्या घटना असूनही अतिशय प्रवाही भाषा असल्याने कुठेही थांबावसं वाटत नाही. एक समकालीन स्वतंत्र दर्जेदार कादंबरी म्हणून या साहित्यकृतीचे भविष्यात अस्तित्व असेलच, पण व्यक्तिगत माझ्या लेखी ..दाभोळकरांचा लेखकावर असणारा प्रभाव, त्यांची झालेली हत्या, त्या अनुषंगानं त्यांना जॉर्ज ऑर्वेलची मदत लागणं, त्या विचार सूत्राने झालेलं निर्भीड लिखाण, होणाऱ्या परिणामांची जाणीव असूनही व्यक्त झालेली प्रामाणिक ओजस्वी लेखन मूल्यं..यांची उंची खूप मोठी आहे,म्हणून या कादंबरीचं मला विशेष कौतुक वाटतं.

शेवटी 75 वर्षांच्या कालखंडानंतरही ज्याच्या अनुभवाच्या गाठोड्यातून,उत्कट प्रतिभाशक्तीतून, सहज उपजलेल्या विचारांचं कथाबीज, तिळमात्र न बदलता, समाज- राष्ट्र -विश्वाच्या जनमानसावर जसेच्या तसे लागू पडते, त्या जॉर्ज ऑर्वेलला साष्टांग दंडवत तर आपल्या मार्मिक लेखन शैलीतून आशयघन वैश्विक निर्मितीमूल्यांना अधिक श्रीमंत करतानाच भारतीय वर्तमानाला आरसा दाखवल्याबद्दल बांदेकरांना कडक सॅल्यूट!!

3 thoughts on “ऍनिमल फार्म ते इंडियन ऍनिमल फार्म!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s