अपूर्णत्व

‘स्व’त्वाच्या अनामिक कोशातून बाहेर पडलेल्या कुठल्याही जीवाला पडणारा प्रश्न तितकाच मूलभूत,तितकाच अगतिक नसेल का?वांझोट्या वर्तमानासोबत दैदिप्यमान भूतकाळाशी यथाशक्ती प्रामाणिक असल्याची आशा असलेला भविष्यकाळ डोळे किलकिले करून दबा धरून बसलेल्या श्वापदाप्रमाणे अंगावर येणारच नाही याची खात्री काय?तमाम इच्छा आकांक्षांचे ओझे अंगावर झुलवत तापलेल्या सूर्यासोबत वाटेचे अंतर सपासप कापत जाते अन प्रश्नांचा गुंतावळा वाढत जातो. एव्हाना बोचऱ्या प्रश्नांची टोके आता अणकुचीदार झालेली असतात, सूर्यही आग ओकत राहतो. मोहाची एकूणएक लक्तरे अवशेषासकट वेशीवर टांगून आलेल्या संन्याशाप्रमाणे समोरचा रस्ता त्याला भेसूर तरी अर्थपूर्ण वाटायला लागतो. कितीही नकोसं वाटलं तरी तो चालायचं थांबत नाही. हा हा म्हणता सूर्य मान टाकतो अन संध्याकिरणांची नक्षी आसमंताला भिजवून टाकते,तशी प्रश्नांची उकल अधिकाधिक क्लिष्ट होत जाते.धापा टाकत चालणारा गडी आडोशासाठी आसरा शोधता शोधता थकून जातो.इकडे सांजप्रहर उलटून रात्र मध्यान्हाकडे झुकायला लागते.. आताशा जमिनीकडे पाठ टेकलेला गडी अनिमिष डोळ्यांनी फाटक्या आभाळाकडे टक लावून पाहत राहतो..डोक्यातल्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर सापडलं नसल्याने झोप येण्याची पुसटशीही शंका राहत नाही..कूस बदलून,पाखरांना दगडं मारून,जोरजोरात ओरडून, कशानेही समाधान होत नाही..रातकिड्यांचे सततचे आवाज रात्रीच्या धीरगंभीर स्वभावाशी तादात्म्य पावत असतात. अस्वस्थतेची इंगळी डसलेला गडी सगळे प्रयोग करून निमूटपणे जागेवर येऊन पडतो.. तसा त्याच्या नजरेसमोर येतो अर्धमुर्धा चांदवा!! थोडंसं निरखून तो त्याच्याकडे पाहतो अन क्षणात डोक्यात वीज चमकते…होय..होय..हेच ते..हेच ते..!!
अपूर्णत्व!!
डोक्यातल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्याला सापडलेले असते.. पहाटेच्या दवासवे अलगद डोळ्यात उतरलेल्या निद्रेला चिरंतन समाधानाच्या उबेसकट तो शरण जातो नि दूर कुठेतरी अगम्य ठिकाणी एक गाठ सुटते..!!
– अशफाक