असंबद्ध प्रश्नांची गोळाबेरीज

“प्रश्न असा आहे की, कोणाचं जीवन संपूर्ण सुसंगत असतं?माणूस म्हटला की contradictions आणि परस्पर विरोधी तपशीलाशिवाय दुसरे काही सापडायचं नाही.” ‘सात सक्कं त्रेचाळीस’ या आगळ्यावेगळ्या फॉर्म मधल्या कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत किरण नगरकर हे वाक्य जेव्हा वापरतात तेव्हा नकळत तिच्या गाभ्यातील प्रयोजनाचा,तिच्यातील पात्रांच्या प्रवाहाचा, भावनिक गुंतागुंतीचा भाषिक अनुवाद करत असतात.येनकेन प्रकारेण मनुष्य योनीत जन्म झालेल्या जिवाचा पहिल्या श्वासापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत मांडल्या गेलेल्या उभ्या-आडव्या पटावर वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या आकारांचे ‘स्व’त्वाचे निदर्शक असणारे कित्येक ठिपके ठाण मांडून बसलेले असतात, त्या असंबद्ध ठिपक्यांना तितक्याच असंबद्ध शैलीद्वारे कागदावर जोडण्याचा प्रयत्न म्हणजे ‘सात सक्कं त्रेचाळीस’!!

अर्थात, त्यांची पहिली आणि मराठीतली शेवटची कादंबरी. कादंबरी या अर्थाने की यात ‘कुशंक पुरंदरे’आपल्याला लेखकाच्या मनातली गोष्ट सांगणारा माध्यम आहे. सोबत मोजकीच पात्रं आहेत, ते आपली आपली ठाम भूमिका उराशी बाळगून अवती भवती वावरताहेत. अनेक संवादी विसंवादी प्रसंगातून उभारलेलं कथानक जसजसं पुढे सरकतं, तसे फ्लॅशबॅक, जम्पकट्स ही सहसा सिनेमात आढळणारी तंत्रे इतक्या वेळा, इतक्या तऱ्हेने कादंबरीचा ताबा घेतात की एकूण लिखाणाच्या फॉर्म,आकृतिबंधाविषयी शंका घेण्यास वाव मिळतो. सहसा प्रचलित एकरेषीय कादंबऱ्यांमध्ये मूळ नायकाच्या भूमिकेला विसंगत ठरवू पाहणाऱ्या प्रसंगांची, कथानकांची मांडणी एका विशिष्ट मर्यादेनंतर उभी राहत नाही. नगरकरांनी त्यांच्या लिखाणासाठी पुरेसे स्वातंत्र्य घेताना याच मुद्द्याला हात घातला आहे.

सबंध कादंबरीभर ‘हाईड अँड सीक’ चा खेळ खेळणारी पात्रं ओळखीची वाटतात. “Wont you ever understand, Kushank? The trick is in seeing obvious” म्हणणारी आरोती, तिचं कुटुंब, प्राचिंती,रघु, सधन,ओखोन,चंदनी,रशीद, काकू आपले अस्तित्व काळाच्या पटलावर दाखवून देतात. आणि अक्षरशः ‘य’वेळा येणारी ‘तू’!! ‘तू’या संबोधनाशी ‘कुशंक’चा मुक्त संवाद अखंड चालू राहतो. नगरकरांनी ओघवत्या शैलीत निवेदनाची व संवादांची उंची, त्यातले सातत्य आणि वेगळेपण जपले आहे.मुंबई, पुणे,नंदीढेला वेळोवेळी आपली भौगोलिक ,सांस्कृतिक वैशिष्ट्यचिन्हे अंगावर वागवत भेटतात. मराठी सोबतच हिंदी, इंग्रजी भाषांचं पानापानावर रेंगाळणं या कादंबरीच्या स्वतःच्या फॉर्म विषयी असणाऱ्या प्रामाणिकपणाचा दाखला आहे. सहज बोलता बोलता पात्रं वैश्विक तत्वज्ञानाला अलगद कवेत घेतात. त्यात कुठलाही बोजडपणाचा, बडेजावाचा अंश सापडत नाही. जागोजागी असणारी स्वगतं त्याच्या आंतरिक उपरेपणाच्या, हव्यासाच्या,न्यूनगंडाच्या,क्वचित अहंपणाच्या गोष्टी सांगतात. प्रवाही कथनशैली वाचकांना खिळवून ठेवते मात्र कथानकाची सूत्रं जोडू पाहणाऱ्या नवख्या वाचकांची दमछाक होण्याची दमछाक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

“जन्माला आल्यावर चापट मारली की आपले चोचल्याचे दिवस संपले, हे लगेच समजायला हवं..जितक्या लवकर हे आपल्याला समजतं तितके आपले हाल व कष्ट कमी” अशी धारणा अंगी बाळगलेला कुशंक जगण्याच्या तिन्ही मितींविषयी डोळस आस्था बाळगणारा आहे. चौथ्या मितीला हाका मारत, चाचपडत,गोंजारण्याचा अथक प्रवास सुरू आहे.”प्रत्येकाकडे एक काळोख असतो.. प्रत्येकाच्या काळोखाची आकृती वेगळी.. तुझ्या कोंडलेल्या काळोखात कोण राहतं?”असा प्रश्न विचारून तो गहन चित्त- प्रवृत्तीचं दर्शन घडवतो. रंग, गंध, स्पर्शाच्या ताकदीची उपजत समज त्याला आहे. इहलोकाच्या भौतिक सुखामागे धावण्याची अनिवार ओढ तसेच धावून धावून रस्ता संपल्यानंतर मागे उरणाऱ्या अपूर्णतेशी स्वैर रोमान्स करण्याची त्याची मनस्वी तयारी आहे. स्वतःच्या आणि इतरांच्या स्वभावविशेषांची तो परखड तर्कशुद्ध चिकित्सा करण्याचा यथाशक्ती प्रयत्न करतो. निराशेची सावली त्याला कधी कधी alienation कडे झुकवते, तरी तो हतबुद्ध ,भावनाविवश होत नाही. “अजून जगभर भविष्य ओसंडते” म्हणताना त्याचे डोळे आश्वासक उमेदीने चमकून जातात. जगभरातल्या कुठल्याही सेन्सिबल माणसाला असणाऱ्या ‘मृत्यू’ नावाच्या संकल्पनेविषयी असणारं टोकाचं आकर्षण त्याच्या मेंदूत नवनवे प्रश्न तयार करतं. आयुष्यभर प्रेयसीने वारंवार विचारलेल्या ‘क्या फर्क पडता है?’ ला तो सफाईदारपणे ‘पडता है ,पडता है, पडता है!’ म्हणून वेळ निभावून नेतो. शेवटी मात्र विविध अनुभवांती आपल्या उत्तराचं फोलपण जाणवणं, त्याचा विषाद, त्याची खंत बोचल्याशिवाय राहत नाही. कुठल्याही आटपाट गाव- नगर- शहरात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या जगण्याचं मूलभूत प्रयोजनच ‘पेटंट नॉन्सेन्स’ असल्याचे भास त्याला सतत होत असल्याने त्याचे विचार विश्व ढवळून निघते. नगरकरांनी ‘डार्क ह्युमर’चे निरनिराळे शेड्स वापरून कादंबरीला नैराश्याची नोंदवही होण्यापासून रोखले आहे,हे त्यांचं निर्विवाद यश म्हणावं लागेल. अभिजात कथन शैलीला भाषिक सौंदर्यसौष्ठवाची जोड लाभल्याने कादंबरी विलक्षण परिणामकारक ठरते.

किरण नगरकर यांची ओळख मला (आणि कदाचित समवयस्क बहुसंख्य मराठी भाषिक वर्गाला) होण्यासाठी त्यांच्या मृत्यूचा योग येणे ही वेगळ्याच प्रकारची शोकांतिका म्हणावी लागेल. तसा इंग्रजी साहित्य विश्वात दबदबा असलेला, साहित्य अकादमीचे कित्येक पुरस्कार खिशात असणारा,इतकेच काय तर जर्मनीचा सर्वोच्च मानाचा ऑर्डर ऑफ मेरीट ने नावाजलेला हा अस्सल अभिरुचीसंपन्न लिखाणातला कमाल उंचीचा माणूस!!तत्कालीन मराठी समीक्षक(अपवाद वगळता) आणि वाचकांकडून उपेक्षा झालेली. इंग्रजीमध्ये ‘बेड टाइम स्टोरी’, ‘ककोल्ड’, ‘रावण अंड एडी’, ‘गॉड्स लिटल सोल्जर’ सारखी प्रचंड गाजलेली पुस्तके नावावर असणारा प्रथितयश लेखक तथाकथित ‘सत्ताकेंद्रे’,’सेन्सॉरशिप’ च्या नादी न लागता आपल्याला वाटेल त्या विषयावर, रुचेल त्या भाषेत खुल्या दिलाने लिहीणारा होता. ‘वाचक अनुनय’ कितपत करावा याची उत्तम जाण असणारा, लेखन मूल्यांशी प्रामाणिक असणारा स्वभाव त्यांना हयातीत लोकप्रियता मिळवून देऊ शकला नाही. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या लेखनाला विशेषतः नवीन पिढी कडून लाभलेलं प्रेम,’कल्ट स्टेटस’ त्यांना अजरामर करून जाईल याबाबत शंका वाटत नाही.

या कादंबरीतली काही आवडलेली अवतरणे इथे देण्याचा मोह आवरत नाही..

*काळ अख्ख्या जगभर पसरलाय. अस्ताव्यस्त आणि बारकाईने. देवाकडे एक अफाट जगभर पोतं आहे आणि देवाला झाली घाई.सैरावैरा ओक्साबोक्शी क्षण न क्षण तो त्या पोत्यात कोंबत आहे. या इथून त्या तिथपर्यंत. देवाच्या या टोकापासून ते त्या टोकापर्यंत. जेव्हा देवानं पहिला गोष्टीला हात लावला, तेव्हापासून वर्तमानाचं नरडं दाबून भूत बनवण्याचा त्याचा एकाकी धंदा .झपाटलंय त्याला आणि तो आपल्याला झपाटतोय. त्याचं काम कधी संपत नाही. घामानं थबथबलाय तो!

*We’re all going to die anyway and it is good to tell when one likes and good to know one is liked.You see,I don’t need your desperately or lovingly or longingly or Anything of the kind or may be this itself is a desperation and longing, needing someone this way- how do I know? But you are just there and it is quite frustrating and not right when you are not.I am not happy or dissatisfied.I’m not.And I don’t call you up in particular moods,but it seems natural.It is right when I feel deeply,it is you whom I must tell.

*माणूस कितीही मुक्त झाला असला तरी तो स्वतःला कुठेतरी आणि कोणाशी तरी बांधून घेतो. मानसशास्त्र आणि तत्त्वज्ञान या प्रवृत्तीची किंवा त्या नेमक्या बंधनाची कारणं हजार देईल पण human bondages चा मुद्दा अटळ.बंधनं आवडती असोत,नावडती असोत वा भूतकाळातली. आपण बांधलेले.पटली नाहीत आणि झिडकारायचे वा सुटकेचे हजार मार्ग सापडले,तरी बांधलेले!!

*मला काही काही गोष्टी समजतच नाहीत. त्या घडत असताना मी त्यांना बघतो.डोळे उघडे ठेवून .त्यांच्याबरोबरचा क्षुल्लक, असंबद्ध, विनाकारण तपशील मी टिपून घेतो. सगळ आठवतं मला. जसं घडलं तसं; पण आतापर्यंत लागेबांधे नसलेल्या संकटात गुरफटून बसलेल्या त्या एका घटनेला अचानक वाचा फुटते.इतक्या दिवसांची वांझोटी, कोणाच्या अध्यात ना मध्यात विधवा पण सती सावित्रीच्या संकटासारखे बोकाळते, माझ्या नकळत तो सारा काळ, तिनं असंख्य परिणाम होऊ घातलेले असतात. स्वतःचा एक स्वतंत्र संदर्भ निर्माण करते आणि माझ्या सार्‍या जीवनाला त्यात गुंतवते.