शोध

wp-1463564295884.jpegअस्ताव्यस्त पसरलेल्या सृष्टीच्या
अतोनात कोलाहलापासून
दूर कुठेतरी
कुठल्या तरी आकाशगंगेच्या पायथ्याशी
एक अशी जागा असेल..

जिथे फेकून दिलेली असतील
भावभावनांची आंदोलने,
प्रेम,राग,मत्सर,क्रोधासहित
समस्त लोभांची कुंडले,
नग्न देहाच्या उपजत शहाऱ्याप्रमाणे
उमटावीत निसर्गाची अक्षरे
मनाच्या अणु रेणुंवर!!

जिथे रंगांचे अर्थ दूषित नसतील,
आणि नसेल,
डोळ्यातले पाणी गढूळ काळेभोर,
ऐकू यावी हिरव्याकंच जंगलांची
पक्ष्यांशी चाललेली हितगूज,
त्वचेआड उमलून आलेल्या
स्पर्शाच्या जाणिवेइतकी स्पष्ट!!

शमावी भूक केवळ चंद्र पाहून,
पहाटेच्या दवबिंदूंनी तहान भागावी,
कवेत घ्यावेत इंद्रधनुष्याचे रंग,
खेळावा लपंडाव क्षितिजांच्या अंगणात,
फुलांचे सुवास श्वासांचे शब्द व्हावेत,
कवितेच्या गर्द तळ्यात
अर्थासहित उमलावेत!!

चालतो आहे अनादिकालापासून
त्या जागेच्या शोधात,
मागच्या कित्येक जन्मांप्रमाणे
हाही जन्म फुकटच जाणार
बहुतेक!!!

4 thoughts on “शोध

Leave a comment